ठाणे -पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना समोर आली आहे. चक्क एका २० वर्षीय युवकाने वायफाय कनेक्शनला 'लष्कर ए तालिबान'च नाव दिल्याने रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. खडकपाडा परिसरातील अमृत हेवन कॉम्प्लेक्स येथे ही घटना घडली आहे.
कल्याणमध्ये खोडसाळपणा..! वायफाय कनेक्शनला 'लष्कर ए तालिबान'च नाव - लष्कर ए तालिबान
कल्याण पश्चीमेकडील अमृत हेवन कॉम्प्लेक्समधील काही रहिवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये आज दुपारच्या सुमाराला वायफाय सर्च करताना अचानक 'लष्कर ए तालिबान'च नाव दिसल्याने ही घटना उघडकीस आली.
![कल्याणमध्ये खोडसाळपणा..! वायफाय कनेक्शनला 'लष्कर ए तालिबान'च नाव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2486273-354-5bbf78ef-e4e8-44e2-b531-194a5d9c21eb.jpg)
कल्याण पश्चीमेकडील अमृत हेवन कॉम्प्लेक्समधील काही रहिवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये आज दुपारच्या सुमाराला वायफाय सर्च करताना अचानक 'लष्कर ए तालिबान'च नाव दिसल्याने ही घटना उघडकीस आली. वायफाय सर्च करून पाहणाऱ्यांनी ही खळबळजनक घटना सोसायटीमधील इतर रहिवाशांना दिली. सोसायटीमधील प्रमुख रहिवाशांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेवून या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वायफायचे नेटवर्क ट्रेस करुन पाहिले असता त्या सोसायटीत एका घरातून सिग्नल दाखवत होता. त्यानंतर या ठिकाणी राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाला ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी निव्वळ मजा म्हणून ‘लष्कर ए तालिबान’ नाव ठेवल्याचे त्याने खडकपाडा पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे या तरुणाने ‘लष्कर ए तालिबान’ या नावात वेगळेपण असल्याने नाव ठेवल्याचे युवकाने सांगताच पोलिसांनी त्याला कडक भाषेत समज दिली आणि तत्काळ वायफायचे नाव बदलण्याच्या सूचना दिल्या. त्यानेही तात्काळ 'लष्कर ए तालिबान’ हे नाव बदलून घेतल्याने त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी करून त्याला सोडून दिले.
दरम्यान, इसीस या अंतरराष्ट्रीय दहशदवादी संघटनेत कल्याणचे ४ तरुण २०१४ साली सहभागी झाल्याचे उघड होताच देशात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंब्रा परिसरातही काही दहशतवाद्यांची केंद्रीय सुरक्षा दलाकडून धरपकड करण्यात आली होती, तर भिवंडी शहरातही देशाच्या दृष्टीने घातक असलेले ३ ते ४ ठिकाणी बोगस टेलीफोन एक्सेंजवर गुन्हे शाखाच्या पथकाने छापेमारी करीत उध्वस्त केले आहे. यामुळे देशातील सर्वच केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे लक्ष कल्याण शहरावर केंद्रित असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या युवकाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.