ठाणे -कळवा येथील डोंगरावर अनेक अनधिकृत झोपड्या निर्माण झाल्या असून पावसामुळे या झोपड्यांवर दरड कोसळून हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो व माळीण येथे घडलेल्या घटनेपेक्षाही महाभयंकर घटना येथे घडू शकते, असा गंभीर इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
कळवा डोंगरावरील आतकोनेश्वर परिसरात रात्री 12 वाजून 20 मिनीटांच्या सुमारास आदर्श चाळी जवळील एका घरावर डोंगराचा काही भाग कोसळला. यामुळे घराची भिंत देखील कोसळली. या कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली एकूण तीन व्यक्ती सापडल्या. यात बिरेंद्र जैस्वार व सनी जैस्वार या पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीरेंद्र यांची पत्नी नीलम हिला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. सदर जागा ही वनविभागाची असून त्यावर एवढ्या झोपड्या कोणी बांधल्या याचे राजकारण आपल्याला करायचे नसून कळवा स्थानकाजवळ असलेल्या मफतलाल कंपनीच्या खासगी जागेवर या सर्वांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आदर्श चाळीजवळचा भाग धोकादायक असल्यामुळे सदर ठिकाणाहून वीस कुटुंबातील एकूण सत्तर लोकांना ज्ञानगंगा शाळेमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.