ठाणे - उल्हासनगर तहसील कार्यालयमध्ये संजय गांधी निराधार योजना विभागातील एका महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून दोन हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. दीपाली पवार असे लाचखोर लिपीक महिलेचे नाव आहे.
तहसील कार्यालयातील महिला लिपिकास लाच घेताना अटक
उल्हासनगर तहसील कार्यालयमध्ये संजय गांधी निराधार योजना विभागातील एका महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून अटक केली आहे. दिपाली पवार लाचखोर महिला लिपीकाचे नाव आहे.
लाचखोर दिपाली पवार ही महिला लिपिक संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतील अनुदान मंजुरी देण्याचे काम करते, अशाच एका अपंग तक्रारदारकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी तिने ४ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती २ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
दरम्यान, तक्रारदार यांनी थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार आज दुपारच्या सुमाराला ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकासह तहसील कार्यालयात सापळा रचला होता. या सापळ्यात लाचखोर दिपाली २ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विलास मते यांच्या पथकाने तिला रंगेहाथ अटक केली. दीपाली पवार या कार्यालयात येणाऱ्या पीडित अपंग नागरिकांशी उद्धटपणे वागत असे तसेच त्याबद्दल अनेक पीडित नागरिकांच्या तक्रारी असल्याच्या या कारवाईनंतर समोर आले आहे.