ठाणे - लॉकडाऊन वाढवल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या हजारो मजुरांची उपासमार सुरू झाली आहे. त्यातच काही मजुरांनी जीव धोक्यात घालून उपाशीच उन्हातान्हातून गावी जाण्यासाठी पायी प्रवास सुरू केला असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबई-नाशिक मार्गावरील पडघा गावच्या हद्दीत उघडकीस आली असून या घटनेमुळे स्थलांतरित मजुरांचे लोंढे आवरण्यात स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'लॉकडाऊन इफेक्ट'; जीव धोक्यात घालून मजुरांचा मुंबई ते उत्तर प्रदेश पायी प्रवास
मुबंई परिसरातील बोरिवली, गोरेगाव परिसरात राहून पोटाची खळगी भरणारे मजूर उत्तर प्रदेश राज्यातील आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी सतराशे किलोमीटर पायी प्रवास रात्रीपासून सुरू केला आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी व वाढविलेला लॉकडाऊन यामुळे हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काल मुंबईतील वांद्रे आणि ठाण्यात मुंब्रा परिसरात राहणाऱ्या शेकडो मजुरांचा जमाव गावी जाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहावयास मिळाले होते. त्यातच मुबंई परिसरातील बोरिवली, गोरेगाव परिसरात राहून पोटाची खळगी भरणारे मजूर उत्तर प्रदेश राज्यातील आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी सतराशे किलोमीटर पायी प्रवास रात्रीपासून सुरू केला आहे. हे २० ते ३० मजूर आज दुपारच्या सुमाराला भिवंडी तालुक्यातील पडघा गावच्या हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गावरून गावी जाण्यासाठी उन्हाचे चटके सोसत पायी चालतच रवाना झाले आहेत. त्यांच्याजवळ विसाव्यासाठी केवळ अंथरून व एक, दोन अंगावरील कपडे हे घेऊनच पायी निघाले आहे.
उन्हातून चालत असताना थकवा जाणवला तर महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडाखाली विश्रंती घेऊन पुन्हा पुढील प्रवासाला निघायचे अशी त्यांची दिनचर्या आहे. दरम्यान, परराज्यातील नागरिकांनी आहे तिथेच राहावे. त्यांची सर्वतोपरी काळजी प्रशासन घेईल असे राज्य सरकारकडून वांरवार घोषित करण्यात येते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही प्रकारच्या शासकीय यंत्रणेची मदत आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याने आम्ही पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला, असे मजुरांनी सांगितले.