ठाणे -लॉकडाऊन वाढल्यामुळे अनेक मजूर छुप्या मार्गाने आपल्या गावाकडे निघाले आहेत.पोलिसांच्या सतर्कतेमुळे भिवंडीहून उत्तरप्रदेशला जाणारा प्रवासी कंटेनरमध्ये पकडले गेले. धक्कादायक बाब म्हणजे ६० जणांनी या जीवघेण्या प्रवासासाठी एक हजार, तर कोणी दोन हजार या कंटेनर चालकास दिले होते. तसेच एका व्यक्तीने स्वतः जवळ पैसे नसल्याने गावावरून पैसे मागवून एक हजार रुपये भाड्यापोटी कंटेनर चालकास दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कंटेनरमध्ये एकमात्र महिला आपल्या दोन चिमुरड्यांसाह गावी निघाली होती.
भिवंडीहून उत्तरप्रदेशात जाण्यासाठी कामगारांचा कंटेनरमधून जीवघेणा प्रवास, चालकाला दिले २ हजार रुपये - कंटेनरमधून कामगारांचा प्रवास
लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले. त्यात उपासमार नको म्हणून हजारो कामगारांवर स्थलांतरीत होण्याची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे काही कामगार गावी जाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू करत आहेत.
भिवंडी शहरातील लकडा मार्केट नवी बस्ती या भागातून हा कंटेनर उत्तरप्रदेश राज्यातील बस्ती व सिद्धार्थनगर येथील कामगारांना बसवून घेऊन जात असल्याची कुणकुण स्थानिक शांतीनगर पोलिसांना लागली. त्यांनी सोमवारी रात्री उशिरा टेमघर पाईपलाईन या ठिकाणी संबंधित कंटेनर थांबवून त्याची तपासणी केली असता कंटेनरमध्ये तब्बल ६० जण दाटीवाटीने बसून आपल्या गावी निघाल्याचे आढळून आले.
करोनाचा प्रसार टाळण्यासाठी सुरुवातीला २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा करत सार्वजनिक प्रवासी व माल वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात कंटेनरमध्ये चोरीच्या मार्गाने स्थलांतर करण्याचा घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. मात्र, १४ एप्रिलला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविला. त्यामुळे स्थलांतरीत मजूर कामगारांची गावाकडे जाण्याची तगमग वाढली असून पुन्हा एकदा भिवंडी येथून उत्तर प्रदेशातील गावी कंटेनरमध्ये बसून जाणाऱ्या तब्बल ६० कामगारांना कंटेनरसह ताब्यात घेतले. यावेळी कंटेनर चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला.