ठाणे -पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी रेल्वे पूल एप्रिल २०२१ पर्यंत खुला होईल, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि संध्याकाळी पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे येथे अरुंद पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. मात्र, हा त्रास या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर कमी होणार आहे, अशी माहिती खासदार राजन विचारे यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान देण्यात आली आहे.
कोपरी येथील रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन नवीन लेन बांधण्यात येणार आहेत. यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याच्या दिशेस असणाऱ्या लेनचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. तर रेल्वे पुलावरील काम रेल्वेमार्फत सुरू आहे. यावेळी खासदार राजन विचारे यांनी या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामात बाधित 7 वृक्षांचे स्थलांतरण येत्या काही दिवसात करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
खासदार राजन विचारे यांचा पाहणी दौरा
नवीन रेल्वेस्थानकाची निर्मिती आणि बांधकामामुळे नागरिकांना होत असलेला त्रास टाळण्यासाठी ज्ञानसाधना कॉलेज ते भास्कर कॉलनी मार्गावर अंडरपासच्या कामाचा आढावा यावेळी खासदार राजन विचारे यांनी घेतला. यावेळी हा दोन लेनचा अंडरपास, सर्विस रोड पेक्षा तीन ते चार मीटर उंचीचा असणार आहे. तसेच या मार्गातून जड वाहने देखील जाऊ शकतील, असे या कामाचे नियोजन सुरू आहे. जुना पूल तोडून नवीन पुलाचे काम सुरू होईल, त्यावेळी या मार्गाचे काम सुरू करता येईल, अशी माहीती एमएमआरडीएकडून विचारे यांना देण्यात आली आहे.
1958 ला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, ठाणे-मुलुंड दरम्यान रेल्वे लाईनचा पूल ४ मार्गिकेचा बांधण्यात आला होता. 1995 नंतर याठिकाणी पूर्व द्रुतगती महामार्गाचे काम रस्त्याच्या दोन्ही बाजूस ८ मार्गीकेचे करण्यात आले. परंतु, रेल्वे पूल ४ मार्गिकेचा असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागत होता. या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 2002 पासून रेल्वेकडे पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र निधी अभावी या पुलाचे काम रेल्वेला पूर्ण करता आले नाही. आता मात्र या पुलाचे काम एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आले आहे.