ठाणे - आज कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. आता मतमोजणी गुरुवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून नवी मुंबईत सुरु होणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
मतदानाची टक्केवारी - कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले. या निवडणुकीकरीता नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यातील एकूण २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदार होते. यामध्ये ६०२९ पुरुष तर ९२७१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. आज झालेल्या मतदानात एकूण १३ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.