ठाणे- कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुक युती आणि आघाडी या दोन प्रमुख पक्षामध्ये ‘काटे की टक्कर’ होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवून काहीसे आवाहन दिले आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी युतीच्या उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला व्यासपीठावरच टाळी दिली होती. त्यामुळे या मतदारसंघातील खरा सामना घड्याळ आणि धनुष्यबाणातच रंगणार हे निश्चीत झाले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा
कल्याण लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३८ उमेदवारापैकी ४ उमेदवारचे अर्ज बाद झाले होते. तर उर्वरित ३२ उमेदवारापैकी ४ जणांनी अर्ज मागे घेतले. कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, वंचित आघाडीचे संजय हेडावू यांच्यासह तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत.
कल्याण लोकसभा अंतर्गत कळवा मुंब्रा, डोंबिवली ,कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण १९ लाख २७ हजार ६०८ मतदार असून त्यामध्ये १० लाख ४० हजार ७९३ पुरुष मतदार तर ८ लाख ८६ हजार ६३१ स्त्री मतदार म्हणजे महिला मतदारांची संख्या सुमारे ४० टक्क्यांच्या आसपास आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा
पक्षीय बलाबल-
कल्याण लोकसभेतील ६ विधानसभापैकी २ म्हणजेच मुंब्रा आणि उल्हासनगर राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तर अंबरनाथ आणि कल्याण ग्रामीण शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर डोंबिवली विधानसभा ही एकमेव भाजपच्या ताब्यात आहे. तर कल्याण पूर्व मधून भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार आहेत.
आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांची भिस्त आगरी, कोळी, मुस्लिम, आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पारपंरिक मतांवर आहे. त्यातच कल्याण ग्रामीण, मुंब्रा, आणि उल्हासनगर या विधानसभा मतदारसंघातून बऱ्यापैकी आघाडीला मतदान होण्याची शक्यात आहे. तर युतीचे डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांची भिस्त डोंबिवली, कल्याण पूर्व, अंबरनाथ या विधानसभेतील मतदारांवर आणि भाजप सेनेच्या पारंपारिक मतावर अवलंबून आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुत्राला पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी चंग बांधला आहे. यामुळे दोघांमध्येच काटे की टक्कर होणार आहे.
सुशिक्षित कल्याण लोकसभा मतदारसंघात अवघे सहा उमेदवार उच्चशिक्षित
शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील व वंचित बहुजन आघाडीचे सुनील हेडावु यांच्यासह एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचे शिक्षण एम बी बी एस (बॅचलर ऑफ मेडिसिन एन्ड बॅचलर ऑफ सर्जरी) मास्टर ऑफ सर्जरी (अर्थोपेडिक्स) तर त्यांच्यासमोर उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील केवळ दहावी पास आहेत. वंचित आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांनी प्रतिज्ञापत्रात आपले शिक्षण १२ वी पर्यंत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, इतर उमेद्वारांना दहावीपर्यंत पोहोचतानाच घाम फुटला आहे. यामुळे राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा यासारख्या राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या वलग्ना केवळ बोलण्यापुरत्याच केल्या जात असल्याचे दिसत आहे. उमेद्वाराच्या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकली तर शिवसेना वगळता एकाही राजकीय पक्षाने उमेदवाराचे शिक्षन ग्राह्य धरलेले दिसत नाही. तर लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील पदवीधरांचे प्रमाण कमी आहे.
२८ उमेदवारापैकी १५ उमेदवार अपक्ष आहेत. १३ उमेदवार राजकीय पक्षाकडून उभे आहेत. यामधील सहा उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. पदवी पर्यंत तिघांनी शिक्षण घेतले आहे. बारावी उत्तीर्ण झालेले सहा उमेदवार तर दहावी पर्यंत शिक्षण घेतलेले पाच उमेदवार आहेत. तर सात उमेदवाराचे शिक्षण दहावी पेक्षा कमी आहे. एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक अर्हतेपुढे नाही असे नमूद केले आहे. यामुळे तो अशिक्षित आहे का अशी चर्चा रंगली आहे .