नवी मुंबई- वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. जामीन रद्द केल्यानंतर त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जामिनावरचा निर्णय न्यायालयाने राखीव ठेवल्यानंतर आज (रविवारी) अर्णबची रवानगी अलिबाग येथील क्वारंटाइन सेंटर मधून तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तळोजा कारागृहात जाऊन अधिकारी कौस्तुभ कुर्लेकर यांची भेट घेतली आहे. तसेच अर्णव यांना कारागृहात कोणत्याही प्रकारची मारहाण करू नये आणि चांगले जेवण द्यावे, अशी विनंती केली आहे.
अर्णव गोस्वामींना मारहाण करू नका; किरीट सोमय्यांची जेलरला विनंती - तळोजा कारागृहात सोमय्या
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आणि जामिनावर निर्णय न झाल्याने अर्णबची रवानगी तळोजा कारागृहात केली आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तळोजा जेलला दिली भेट, अर्णव गोस्वामी यांना मारहाण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनल्सचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना मुंबई येथून त्यांच्या घरातून अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनंतर न्यायालयाने १४ दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावताच अलिबाग येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये त्यांना ३ रात्री घालवाव्या लागल्या होत्या. तेथून आता त्यांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे.
यावेळी माझं जीवन धोक्यात आहे, असा आरडाओरडा अर्णव यांनी पोलीस व्हॅन मधून केला होता. तसेच मला माझ्या वकिलांना भेटू दिल जाते नाही, असाही आरोप अर्णबने तळोजा कारागृहात जाण्यापूर्वी पोलिसांवर केला आहे. यावर अर्णवला देण्यात येणाऱ्या वागणुकीचा किरीट सोमय्या यांनी निषेध व्यक्त केला. तसेच त्यांनी आज तळोजा कारागृहात जाऊन तेथील जेलरची भेटही घेतली आहे. अर्णव यांना जेल मध्ये मारहाण करू नये, त्यांची योग्य काळजी घ्यावी, अशी विनंती जेलर कौस्तुभ कुर्लेकर यांना केली. त्यावर त्यांनी त्यांना सर्व सोयी पुरवल्या जातील, तसेच आवश्यक ते उपचारही त्यांना पुरवण्यात येईल, असे आश्वासन कुर्लेकर यांनी दिले असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.