ठाणे: पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनिता पाटील या घारिवली गावातील अर्जुन एम्पायर इमारती मधील एका आलिशान घरात एकट्याच राहत होत्या. तर त्यांना एक विवाहित मुलगी असून ती सासरी राहते; मात्र दोघी माय-लेकीचा दररोज मोबाईलवरून संपर्क होत होता. आज (शनिवार) मुलगी आईला सकाळच्या सुमारास मोबाईलवरून संपर्क करत होती. मात्र सतत मोबाईलवर संपर्क करुनही आई प्रतिसाद देत नसल्याने मुलीला संशय आला. त्यामुळे ती तातडीने आई अनिताच्या घारिवली गावातील अर्जुन एम्पायर इमारती घरी आली होती. मात्र बराच वेळ दार ठोठावूनही आई दार उघडत नसल्याने तिने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.
चोरी, हत्येच्या गुन्ह्याची नोंद:त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने बाजूच्या खिडकीतून अनिता यांच्या घरात डोकावून पाहिल्यावर अनिता मृत अवस्थेत घरात पडल्या होत्या. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने गायब झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर मृतक अनिताच्या मुलीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात हत्येसह दागिने चोरीचा गुन्हा दाखल केला.