ठाणे- घराबाहेर खेळत असलेल्या एका 5 वर्षीय चिमुरडीचे उल्हानगरमधून अपहरण झाल्याची घटना घडली होती. मात्र, पोलिसांनी सीसीव्हीटी फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्याला 12 तासातच खारघर परिसरातून ताब्यात घेत त्याच्या तावडीतून चिमुरडीची सुखरूप सुटका केली. नुरआलम नबीहुसन अन्सारी (वय 40 वर्षे), असे अपहरणकर्त्याचे नाव आहे.
उल्हासनगर शहरातील 5 वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर तिच्या वडिलांनी मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी 4 पोलीस पथक तयार केले. त्या पथकांनी अपहरण करण्यात आलेल्या ५ वर्षीय मुलीचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे, असलम खतीब, पोलीस उपनिरीक्षक यागेश गायकर, संतोष वझे, पोलीस हवालदार संजय बेंद्रे आदी पोलिसांनी उल्हासनगर परिसरात. तसेच मुलीचे अपहरण झालेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. याशिवाय काही नागरिकांकडे पोलिसांनी चौकशी केली असता 35 ते 40 वर्षीय एक व्यक्ती त्या मुलीला घेऊन जात असताना दिसल्याचे पोलिसांना सांगितले.