ठाणे- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा सन 2020 ते 2021 चा अर्थसंकल्प ऑनलाइन मंजूर करण्यात आला आहे. 2 हजार 139 कोटींची तरतूद या आर्थिक वर्षासाठी करण्यात आली. महापालिकेच्या उत्पन्नात 142 कोटींची अतिरिक्त वाढ अपेक्षित असणारा हा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी गुरुवारी महासभेत सादर केला.
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव पाहता योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे. मात्र, राज्य सरकारकडून अजूनही फारशी मदत प्राप्त झाली नसल्याने महापालिकेच्या अर्थसंकल्पातून या रकमेची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पाहून कोणतेही नवीन विकासकामे हाती न घेता सुरू असलेली कामे पुर्ण करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. तसेच, कोरोनामुळे जी कामे पूर्ण करता आली नव्हती, त्यांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात आर्थिक परिस्थितीचा आठवड्याभरात आढावा घेऊन कुठली कामे करायची याचा निर्णय घेऊ असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. मात्र नवीन कामे नसल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.