ठाणे- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणत संख्या वाढ होत आहे. मंगळवारी एकाच दिवशी ४६२ रुग्ण आढळून आल्याने, पालिका प्रशासनाने २ जुलै ते १२ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे.
कल्याण डोबिंवलीमध्ये १२ जून ते १९ जून या ८ दिवसाच्या कालावधीत १ हजार ३१५ त्यानंतर २० जून ते २७ जून या ८ दिवसाच्या कालावधीत २ हजार २९८, तर २८ ते ३० जून या तीनच दिवसात १ हजार १६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील १९ दिवसापासून आजपर्यत प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहता महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
कल्याण डोबिंवलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १२० जणांचा मृत्यू झाला. तर २ हजार ३८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या ४ हजार ६६ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी आढळून आलेल्या ४६२ रुग्णापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यत महापालिका हद्दीत ६ हजार ५७५ रुग्णांची नोंद असल्याचे, पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.