ठाणे - ठाण्यात 30 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी सोमवारच्या साप्ताहिक बैठकीत दिले. या आढावा बैठकीत आयुक्तांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभाग क्षेत्रांतर्गत असलेल्या ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या इमारतींचे मालक, भोगवटादार, गृहनिर्माण सहकारी संस्थांचे चेअरमन यांना नोटीसा बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
केडीएमसीने दिले इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश - oner
इमारतीचा मालक किंवा भोगवटादार, इमारत मानवी वस्तीसाठी राहण्यायोग्य असल्याचे 'बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र' महापालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून प्राप्त करुन घ्यावे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २६५ (अ) मध्ये इमारतीच्या भोगवटा करण्यास परवानगी दिल्याच्या दिनांकापासून किंवा तिच्या बांधकाम क्षेत्राच्या किमान ५० टक्के इतक्या क्षेत्राचा प्रत्यक्ष भोगवटा केल्याच्या तारखेपासून, यापैकी जी तारीख आधीची असेल त्या दिनांकापासून ३० वर्षांचा कालावधी समाप्त झाला असेल, अशा इमारतीचा मालक किंवा भोगवटादार, इमारत मानवी वस्तीसाठी राहण्यायोग्य असल्याचे 'बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र' महापालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून प्राप्त करुन घ्यावे. त्याअनुषंगाने, अशा इमारत धारकांनी तातडीने संबधित अभियंत्याकडून स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे. पावसाळ्यात, अशा इमारतींची पडझड झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही मनपा आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी महापालिका क्षेत्रात धोकादायक २१० आणि अतिधोकादायक १६८ अशा एकूण ३७८ इमारती असल्याचे जाहीर केले होते. सर्वात जास्त १२२ धोकादायक इमारती प्रभाग क्षेत्र 'फ'मध्ये तर, अतिधोकादायक ९१ इमारती 'क' प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत आहेत. अशा इमारतींमधील रहिवाशांनादेखील आवाहन करण्यात येते की, त्यांनी पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित व्हावे, जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही, असेही आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.