ठाणे- डोंबिवली मार्गे कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे येत्या 7 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. शिंदे यांनी 21 ऑक्टोबर 2016 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या मेट्रो मार्गाचे सविस्तर सादरीकरण केले होते.
कल्याण, डोंबिवली, 27 गावे, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसराची लोकसंख्या प्रत्येक दशकात कशा प्रकारे वाढत आहे, याची आकडेवारी सादर करतानाच कुठल्या मार्गाने मेट्रो नेल्यास अधिकाधिक लोकसंख्येला तिचा लाभ होईल, याचे सादरीकरण शिंदे यांनी केले होते. त्यामुळे फडणवीस यांनी त्याच बैठकीत तत्काळ या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील दाखवत डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन त्यांच्या समोरही सादरीकरण केले. त्यानंतर एमएमआरडीएने सदर मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनची नियुक्ती केली.
सदर डीपीआर लवकरात लवकर तयार होऊन त्यास मंजुरी मिळावी, यासाठी देखील शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच एमएमआरडीएच्या स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. 2017 च्या ऑगस्ट महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व खासदार व आमदारांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झाली होती. त्याही वेळी शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.