ठाणे - दिवाळीपूर्वी पासून कल्याण डोंबिवली कोरोना रुग्णांच्या संख्येत जिल्हात अव्वल ठरली आहे. ते आजही कायम असल्याचे जिल्ह्यातील सर्वच महापालिका हद्दीत दिवसागणिक आढळणाऱ्या रुग्ण संख्येवरून समोर आले आहे. रविवारी देखील कल्याण डोंबिवलीत १०७ रुग्ण आढळून आले तर सर्वात अधिक रुग्णांवर उपचारदेखील सुरु आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना रुग्णांत घट झाली. मात्र, कल्याण डोंबिवली आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये जिल्हात अव्वल ठरत आहे.
कल्याण डोंबिवलीत रुग्णांची संख्या ५४ हजार ९७६ वर ..
भिवंडी आणि उल्हासनगर महापालिकाहद्दीत झालेला कोरोनाचा फैलाव दिवाळीनंतर आटोक्यात आला आहे. रविवारी भिवंडीत केवळ २ कोरोनाबाधित रुग्ण तर उल्हासनगर महापालिकाहद्दीत ९ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे येथील कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून येते. मात्र, कल्याण डोंबिवली महापालिकाहद्दीत कोरोनाचा कहर सुरूच असून रविवारी १०७ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकट्या कल्याण डोंबिवली शहरातीलस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ हजार ९७६ वर गेली आहे. कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे आतापर्यत मृत्यू झाल्याची संख्या १ हजार ९७ वर गेली आहे.
उद्योग व कामगार नगरीत कोरोना नाममात्र ..
उद्योग नगरी समजल्या जाणाऱ्या उल्हासनगरात रविवारी ९ नवे रुग्ण सापडल्यामुळे रुग्णांची संख्या ११ हजार ३१४ झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३६१ झाली आहे. भिवंडी शहरात आतापर्यत बाधीत ६ हजार ५९२ रुग्णांची संख्या झाली आहे. तर, ३५१ जणांचा भिवंडीत आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ३०० च्या वर ग्रामपंचायती कोरोनामुक्त
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत १३ कोरोनाबाधित रुग्ण रविवारी आढळले आहेत. तर आत्तापर्यत बाधित रुग्णांची संख्या ८ हजार ८२९ वर गेली असून ३०० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. बदलापूर नगरपरिषद हद्दीत रविवारी १४ रुग्ण नव्याने सापडले असून बाधीत रुग्णांची संख्या ८ हजार ७८४ झाली आहे. मात्र, बदलापूर शहरात रविवारी एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ११७ कायम आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५ तालुक्यात केवळ २१० बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यत ग्रामीणमध्ये रुग्ण संख्या १७ हजार ९२२ च्या घरात गेली आहे. तर आतापर्यत मृत्यूची संख्या ५७८ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ३०० च्या वर ग्रामपंचायती कोरोना मुक्त झाल्याचे समोर आले आहे.