ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकीकडे घेतला आहे. त्यातच आता या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील १८ गावे राज्य सरकारकडून काही दिवसापूर्वीच वगळण्यात आली आहेत. यामध्ये कल्याण ग्रामीण मधील घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर अंबरनाथ तालुक्यातील आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे. तर डोंबिवलीतील आजदे, सागाव, नांदीवली पंचानंद, घारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा ही गावे महापालिका हद्दीत ठेवली आहेत. त्यातच महापालिकेतील नगरसेवकांचे सदस्यत्व ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे.