ठाणे - कोरोनाच्या काळात तीन महिन्यांपूर्वी सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आढळून आले होते. मात्र, दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूदरही काही प्रमाणात खाली आला आहे. पण, कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यविधीची भीती कायम असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे अंत्यविधीसाठी नातेवाईकांची परवड व त्रास पाहून महापालीकेने 27 जुलैला कल्याण पश्चिम परिसरातील बैलबाजार व लालचौकी, कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी आणि डोंबिवली पूर्वेतील चोळे गाव, पाथर्ली, आणि शिवमंदिर या 6 स्मशानभूमीत ठेकदारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एका मृतदेहावर अंत्यविधीसाठी 3 हजार 700 रुपयांचा ठेका
महापालिका आयुक्तांनी कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी 27 जुलैला पालिका हद्दीतील 6 स्मशानभूमीत ठेकरदारांची नेमणूक केली. तेव्हापासून त्या ठेकेदारांमार्फत कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी 3 हजार 700 रुपयांप्रमाणे दर ठरविण्यात आले. मात्र, ठेकेदारांची नेमणूक करण्यापूर्वी गॅसवरील शव दाहिनीत सततचा बिघाडामुळे कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यविधीसाठी नातेवाईकांना प्रतिक्षा करत दोन ते तीन स्मशानभूमीत मृत्यदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याची वेळ आली होती.
एका मृतदेहावर अंत्यविधीसाठी लागतोय दीडतास
स्मशानातील गॅस दाहिनीत एका कोरोना बाधित मृतदेहावर संपूर्ण अंत्यविधीसाठी दीड तासांचा कालावधीत लागत असल्याची माहिती लालचौकी येथील वैकुंठ भूमीत कार्यरत असलेला कर्मचारी अमोल दाभाडे यांनी दिली. अमोल दाभाडे यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यत 325 कोरोना बाधितांच्या मृतदेहांवर अंत्यविधी केला. मात्र, त्याला कधीही भीती वाटली नाही. कोरोनाची लागणही झाली नाही. पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या अंत्यविधीचा खर्च पाहता लाकडासाठी 2 हजार 200 रुपये, डिझेल 500 रुपये आणि मृतदेहाची सुरुवातीपासून अंत्यविधी संपेपर्यत दोन कर्मचाऱ्यांसाठी 1 हजार (प्रत्येकी 500 रुपये), असे एकूण 3 हजार 700 रुपये ठेकेदारांना अदा करण्यात येत आहे. आतापर्यत 100 मृतदेहांवरील अंत्यविधी करणाऱ्या ठेकेदारांना बिले अदा करण्यात आली आहे.