ठाणे Kalyan Crime News : भर रस्त्यावर कार पार्किंगच्या वादातून दोघा माय लेकानी कार पार्किंग करणाऱ्या चालकासह तिघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला (Incident Caught In CCTV) आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोड वरील चक्कीनाका भागात असलेल्या एका खासगी हॉस्पिटल समोर घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolshewadi Police Station) हल्लेखोर माय लेकावर विविध कलमानुसार जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रिषी राजेश यादव आणि त्याची आई (रा. शास्त्रीनगर कल्याण पूर्व) असे गुन्हा दाखल झालेल्या माय लेकाची नावे असून ते दोघेही फरार झाले आहेत.
कार पार्किंगच्या वादातून मारहाण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कार चालक कन्हैया चंदेशवर झा ( वय २३) हा कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका चाळीत कुटुंबासह राहतो. तो एका खासगी कारवर चालक म्हणून कर्यरत आहे. तर आरोपी माय लेक हे दोघेही कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर भागातच राहतात. त्यातच २४ ऑक्टोबर रोजी सांयकाळच्या सुमारास कार चालक कन्हैया हा काही कामानिमित्ताने कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोड वरील चक्कीनाका परिसरात कार घेऊन आला होता. त्यावेळी त्याने याच रोडवर असलेल्या एका खासगी हॉस्पिटल समोरच कार पार्किंग केली होती. मात्र त्या ठिकाणी कार पार्किंगला आरोपी रिषीने विरोध करत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत असताना आरोपीच्या आईने मुलाच्या हातात लोखंडी रॉड देऊन दोघांनी चालकासह त्याच्यासोबत असलेल्या दोघांना मारहाण केली. तर या घटनेमुळे भर रस्त्यात एकच खळबळ उडाली.