ठाणे : आयपीएल 2022 च्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी या पर्वासाठीचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे पार पडला (Mega auction was held in Bangalore). या लिलावासाठी 590 खेळाडूंची नावे शॉर्ट लिस्ट केली होती. ज्यापैकी 204 खेळाडूंना बोली लावत दहा फ्रेंचायझींनी खरेदी केले. यामध्ये 137 भारतीय आणि 67 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात तब्बल 551.7 कोटींची उलाढाल झाली. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने तुषार देशपांडेला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे.
मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळणारा आणि मुळचा कल्याणचा असलेल्या, तुषार देशपांडेला चेन्नई संघाने बोली (Chennai team bid Tushar Deshpande) लावत आपल्या संघात सामिल केले. चेन्नई संघाने तुषार देशपांडेला 20 लाख या त्याच्या मूळ किमतीवर त्याला खरेदी केले. तुषार देशपांडेला चेन्नईने विकत घेतल्यामुळे आता मराठमोळा कल्याणचा तुषार धोनीच्या साथीने खेळताना दिसणार आहे.
यापूर्वी दिल्ली कॅपिटलचा होता सदस्य -
क्रिकेटपटू तुषार देशपांडे (Cricketer Tushar Deshpande) याने आयपीएलच्या मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बाळगून असलेल्या तुषारसाठी धोनीसोबत खेळायला मिळणे हा सर्वात मोठा आनंदाचा धक्का होता. मी खूप खूश आहे. आता मला महेंद्र सिंह धोनी सोबत खेळण्याची संधी मिळेल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, खूप कमी लोकांना अशा संधी मिळतात. मला संधी मिळाली आहे. भारतासाठी कसोटी सामना खेळण्याचे माझे स्वप्न आहे. माझ्या यशाचे सर्व श्रेय माझ्या कुटुंबाला जाते. कारण कुटुंबाने मला कठीण काळात साथ दिली आहे, अशी प्रतिक्रिया तुषार देशपांडेने दिली आहे.
तुषार देशपांडेने दिल्ली संघाकडून (Tushar Deshpande represented Delhi Capitals) पाच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 132 चेंडू टाकताना 192 धावा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 11.29 च्या इकॉनॉमिने आणि 64.0 च्या सरासरीने 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच यामध्ये त्याची बेस्ट कामगिरी 37 धावा देताना 2 विकेट्स आहेत. त्याचबरोबर त्याने 5 सामन्यातील 3 डावात फलंदाजी करताना 21 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे.