ठाणे -शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीशी घरोबा केल्याच्या विरोधात कल्याण लोकसभा मतदार संघाचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे ( Former MP Anand Paranjpe ) यांच्या डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी जमावबंदी आदेशाचा भंग करून मोर्चा काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता त्या २७ शिवसैनिकांची १० वर्षानंतर कल्याण न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी पी. एन. ढाणे यांनी गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली ( Kalyan Court Acquits Shivsainik ) आहे.
राष्ट्रवादीत सामील झाल्यामुळे मोर्चा
त्यावेळी आनंद परांजपे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २० जानेवारी २०१२ रोजी डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी सदानंद थरवळ, संजय मांजरेकर, राजू नलावडे, स्मिता बाबर, भाऊसाहेब चौधरी, तात्या माने, संदीप नाईक यांच्यासह २७ शिवसैनिकांनी तत्कालीन खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवून मानपाडा पोलीस ठाण्यात बाळकृष्ण साळुंके यांनी सरकार तर्फे फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी २७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.