ठाणे - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंद पुकारण्यात आला आहे. भारत बंदमध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीनेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
शेकडो भाज्या व फळांचे ट्रक बाजार समितीत दाखल होणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला बहुतांश विरोधी पक्षांबरोबरच देशातील नामांकित व्यक्तींचाही पाठींबा मिळत आहे. राज्यामध्ये मनसे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही त्याला पाठिंबा दर्शवला आहे. तर कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनेही या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कृषी बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी सांगितले.