ठाणे - कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 48 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी लगेच आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गुरुवारी पाच तर शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस मिळून कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी लगेच आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे.
एका महिन्याच्या बाळाचा मृत्यू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात साक्षात यमच दारी आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामध्ये पाच रुग्ण दगावल्याने भोंगळ कारभाराचे दिंडवडे निघाले असतानाच शनिवारी याच रुग्णालयात 48 तासात पुन्हा 18 रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर लगेच सोमवारी याच रुग्णालयात आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिन्याच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे.
डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत - कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अपघात विभागातील डॉक्टर्स राजीनाम्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रुग्णालयातील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांच्या त्रासाला कंटाळून हे सर्व डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. अपघात झालेल्यांवर उपचार करायचे की वरिष्ठांचा मानसिक त्रास सहन करायचा अशा विविध अवस्थेत सध्या हे सर्व डॉक्टर्स आहेत. डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर हे कळवा रुग्णालयात गेल्या दोन वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावरील ताण वाढला असताना अपघात विभागातील हे डॉक्टर्स राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.