ठाणे : कळवा रुग्णालय आणि वाद हे आता एक समीकरणच बनून गेलंय. एक वाद संपत नाही तोच दुसरा नवा वाद सुरू होतो. या रुग्णालयात एकाच दिवशी तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्यानं रुग्णालयाची मोठी चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्याच शहरात एका शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेनं संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलीय. ही समिती चौकशीचं काम करतेय, अशाततच या रुग्णालयात नवा वाद सुरू झालाय. नौपाडा पोलिसांनी येथे ठेवलेल्या दोन मृतदेहांपैकी एक मृतदेह गायब झालाय. एका मृतदेहाची ओळख पटल्याने तो मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. परंतु दुसऱ्या मृतदेहाचा कोणताच पत्ता लागत नसल्यानं रुग्णालय प्रशासनाचं धाबं दणाणलं आहे.
मृतदेहाचा शोध सुरू : या प्रकरणाविषयी माहिती विचारली असता रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली नाही. परंतु काही वेळानंतर एक मृतदेह गायब झाल्याचं सांगण्यात आलं. कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतलीय. मृतदेहाचा शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. नौपाडा पोलिसांनी शवागारातील सर्व मृतदेह तपासली नाहीत. एकदा तपासल्यावर त्यांना हरवलेला मृतदेह मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही मृतदेह कळवा हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आली होती. त्यातील एकाची ओळख पटल्याने मृतदेह रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. परंतु दुसऱ्या मृतदेहाची ओळखू पटली नसल्याचं नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितलं.