ठाणे kalwa Encroachment : ठाण्यातील कळवा खाडीतील बेकायदा झोपड्यांवर नुकतेचं प्रशासनानं बुलडोझर फिरवला. त्यानंतर शेकडो कुटुंबं बेघर झाली. कष्टानं जमवून उभं केलेलं संसार क्षणांत उद्धवस्त झाले. नवजात बाळ कुशीत घेऊन अनेक माता अंधारात रात्रं काढण्यास मजबूर झाल्या. सर्व बेघर माता भगिनी व आबालवृद्ध डोळ्यात पाणी आणून आपल्या व्यथा मांडताना दिसले. (kalwa Encroachment)
मागिल ३५-४० वर्षांपासून याच झोपड्यांत चालला संसार : अनधिकृत झोपडपट्ट्या म्हणजे शहरांना लागलेली कीड अशी अनेक विशेषणं आपण नेहमीच ऐकतो. परंतू, त्या झोपड्यांमध्ये राहणारे देखील आपल्यासारखीच माणसे आहेत, हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यांना देखील आपल्यासारखंच दोन वेळच्या जेवणाची भूक असते. आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंताही असते. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा मिळाव्यात यासाठी अनेक योजना येतात. परंतू, दरवेळेला झोपडपट्ट्या उभ्याच राहतात. अशीच एक झोपडपट्टी थेट कळवा खाडीत उभारण्यात आली होती. कुठेतरी आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक कुटुंबांनी आपल्या घामाचा पैसा घालून इथं झोपड्या घेतल्या.
उड्डाणपुलाखाली आश्रय घ्यावा लागला-गेल्या ३५-४० वर्षांपासून याच झोपड्यांतील चार भिंतीत आपलं संसार थाटत अनेकानी आपल्या मुलाबाळांची लग्नंही केली व दुसऱ्या पिढीचे संसार उभे राहिले. परंतू, गेल्या काही वर्षात काही गुंडानी धाक, दमदाटीपणा करून, स्थानिकांना धमक्या देऊन १५ ते २० झोपड्या बांधल्या. इथेच शेकडो लोकांचे नशीब फिरले. पालिकेनं बुलडोजर लावून सगळ्या झोपड्या जमीनदोस्त केल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर अंधकार पसरला. पावसाळ्यात तोडक कारवाई करु नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही ही तोडक कारवाई ठाणे महानगरपालिकेने केली. यामुळे भर पावसात सर्व बेघरांना बाजूच्या उड्डाणपुलाखाली आश्रय घ्यावा लागला. लहान लहान लेकरं घेऊन स्त्रिया अंधारात मच्छरांचा सामान करत रात्र जागून काढत आहेत. रोगराई पसरण्याची भीती आणि अपुरे अन्नपाणी यामुळे सर्वजण बेजार झाले आहेत. त्यातच दोन महिला आपली दहा-बारा दिवसांची बाळं घेऊन चिंताग्रस्त दिसल्या.