ठाणे : गेली २२ वर्ष ठाण्याच्या सिग्नलवर भिक्षेकरी म्हणून दिवस ढकलणाऱ्या प्रभू काळे यांचा मुलगा मोहन काळे 'सिग्नल शाळे'च्या संपर्कात आला. एकेकाळी वडीलांसोबत सिग्नलवर दिवस घालवणारा मोहन पाहता-पाहता दहावी व पुढे चक्क डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकल इंजीनिअरिंगची परीक्षा पास झाला. डिप्लोमा झालेला मोहन आता युरेका फोर्ब्स नावाच्या कंपनीत रुजू झाला आहे. सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या रोमहर्षक प्रवासाने रस्त्यावरील मुलांच्या शिक्षणाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वर्षांपूर्वी तीन हात नाका सिग्नल पुलाखालील वसलेल्या १८ कुटुंबांतील जवळपास ५० मुलांसाठी पुलाखालीच सिग्नल शाळा सुरू झाली. ५ वर्षांपूर्वी मोहन काळे सिग्नल शाळेत दाखल झाला. तेव्हा त्याचे वय दहावीत बसण्याइतके होते. मात्र, पारंपरिक शिक्षणाच्या मूळ प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या मोहन काळेला सिग्नल शाळेत आठवीत दाखल करण्यात आले. तर, पुढील वर्षी मोहन तयारीनीशी दहावीच्या परीक्षेसाठी सज्ज झाला. दहावीत ७२ टक्के मिळवून त्याने सिग्नल शाळेचा विश्वास संपादित केला. त्यामुळे त्याच्या उच्च शिक्षणाचा मार्ग खुला झाला. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मदतीने मोहन काळे रुस्तमजी ग्लोबल करीअर इन्स्टीट्यूटमध्ये डिप्लोमा इन इलेट्रीकल इंजीनिअरिंगचा अभ्यास करू लागला.