ठाणे -कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रूग्णालयाची उभारणी केली होती. या रूग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावण्यात आले होते. मात्र, मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना ठाणे मनपाचे आरोग्य अधिकारी डाॅ. मुरूडकर यांनी हे सर्व साहित्य लंपास केले असल्याचे उघडकीस आले आहे. जर, हे साहित्य येत्या 48 तासात पुर्ववत लावले नाही नाही तर चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार कळवा आणि मुंब्रा भागात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी केली होती. कौसा येथे म्हाडाच्यावतीने अद्ययावत असे कोविड रूग्णालयाची उभारणी झाली होती. मात्र, सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला होता. हाच फायदा घेऊन डाॅ. मुरूडकर यांनी सर्व साहित्य लंपास केल्याचा आरोप आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथील रूग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
निलंबित करून गुन्हा दाखल करा -
या प्रकारामुळे जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. गोरगरीबांसाठी उभी केलेली ही यंत्रणा उद्ध्वस्त करणाऱ्या डाॅ. मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचना त्यांनी केली आहे. आव्हाड यांनी सांगितले की, कोरोनाचा कहर वाढल्याने म्हाडाने उभ्या केलेल्या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. ठाणे मनपाचे आरोग्य अधिकारी डाॅ. मुरूडकर यांनी रूग्णालयातील 94 व्हेंटीलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहेत. म्हाडाच्या मालकीची ही आरोग्य साधने काढून नेताना ऑक्सिजन पाईपलाईनदेखील तोडून टाकण्याचे काम मुरूडकर यांनी केले आहे. ही साधने मनपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे बारा ते चौदा कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली? अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावे, तसेच येत्या 48 तासात सर्व साधने पूर्व स्थितीत आणून सुरू न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -LIVE UPDATE : एका क्लिकवर जाणून घ्या राज्यातील कोरोनाच्या ताज्या घडामोडी