ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्विट करुन मुख्यमंत्र्यांसह भाजपची फिरकी घेतली आहे. आज ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांच्या शुभारंभाचा कार्यक्रम आहे. त्याचे निमंत्रण आव्हाड यांना आहे. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित न राहिलेलेच बरे असे मत आव्हाड यांनी मांडले आहे.
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड म्हणतात मला पाकिटमार ठरवतील, ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना दिला टोला
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करुन आजच्या ठाण्यातील कार्यक्रमाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाल्याची आठवण करुन दिली आहे. तसेच त्याच पद्धतीचा गुन्हा आजही दाखल होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना त्यांनी टोला लगावला आहे.
आव्हाडांची मिश्कील टिप्पणी : जितेंद्र आव्हाड यांनी ट्विवट करुन म्हटले आहे की, 'आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे आमंत्रण दिले. महापालिकेनी पण ब्रिज च्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः साक्षीदार आहेत आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील. त्या पेक्षा कार्येक्रमाला न गेलेले बरं परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कसं कळत नाही … खरच कळत नाही ….. चलो ये वक्त भी गुजर जयेगा …… u too brutas'
काय घडला होता प्रकार :काही दिवसांपासून आव्हाड वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते. त्यांनतर आव्हाड यांच्याविरोधात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याबाबत आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अत्यंत उद्विग्न झाले होते. त्यांनी त्यावेळी आमदारकीचा राजीनामाही दिला होता. मात्र विरोधपक्षनेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या दोघांनी त्यांची समजूत घातली होती.