ठाणे: आपण काँग्रेसी विचारधारेचे असून शरद पवारांचे निष्ठावंत असलो तरीही आगामी ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवू असा शब्द जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांना दिला. गेले दीड वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेली उलथापालथ पाहता, महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभी राहून गद्दारांना धडा शिकवेल असा विश्वास, आव्हाड यांनी व्यक्त केला.
घाबरलेले सरकार हिंमत दाखवत नाही :रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी आणि शहापूर येथे घडलेल्या समृद्धी महामार्गावरील दुर्दैवी अपघातामुळे, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी मंत्री व राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. राजन विचारांनी यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या ठाणेकर शिवसैनिकांचे भरभरून कौतुक केले. शिवसेनेतून फुटून गेलेल्यांना ठाणेकर जनता माफ करणार नाही, त्यांना जरूर धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारने आज निवडणूका जाहीर केल्या तर जनता नेमकी कोणाच्या बाजूने आहे हे सत्य बाहेर येईल. त्यामुळे तेवढी हिंमत घाबरलेले सरकार दाखवत नाही अशी टीका राजन विचारे यांनी केली.