ठाणे -खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले, असा दावा जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. त्यांच्या या दाव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी चांगलीच खिल्ली उडवली. नौपाडा पोलिसांना खेकडे देऊन ‘धरण पोखरणारे हे खेकडे मल्ल्यासारखे पळून जात होते. त्यांना आम्ही पकडून आणले आहे. या खेकड्यांना अटक करा’, असे म्हणत त्यांनी सावंत यांचा अनोखा निषेध केला.
खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले, असे ग्रामस्थ आणि अधिकार्यांचे मत असल्याचा दावा सावंत यांनी केला होता. चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण केली. त्यांच्या या विधानामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या दाव्याचा आव्हाड आणि परांजपे यांनी निषेध केला.
जितेंद्र आव्हाड पोलिसांना खेकडे देताना आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज नौपाडा पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या सहायक पोलीस आयुक्त तडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांच्या हातात खेकडे देऊन,‘ जलसंधारण मंत्र्यांनी सांगितलेले हेच ते खेकडे आहेत. यांनीच धरण फोडले आहे. या खेकड्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करा. या खेकड्यांना जेलमध्ये टाका,’ अशी मागणी करीत हे खेकडे पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी आव्हाड यांनी, “या सरकारमध्ये संवेदनशीलताच राहिलेली नाही. २३ जण वाहून गेले. अजून १० जण बेपत्ता आहेत. तरीही, धरण फुटण्यात आमचा काही दोष नाही, हे धरण खेकड्यांनी पाडले, असे सांगून जलसंधारण मंत्री मोकळे झाले. या नालायक सरकारला काय बोलायचे? आमदाराचा भाऊ तिथे कंत्राटदार म्हणून काम करतो. त्याला अटक करायची नसेल तर नका करू पण, बेशरमसारखे असे काही तरी सांगून मृत आत्म्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना यातना होतील, असे तर बोलू नका, असे म्हणत आव्हाडांनी सरकारवर टीका केली.
मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का, असे पत्रकारांनी विचारले असता, राजीनामा वगैरे लांब राहिले, लोकांच्या प्रती हे किती असंवेदनशील आहेत, याचे हे जीवंत उदाहरण आहे. पुण्यात भिंत कोसळली ती उंदरांनी पोखरली, येथे धरण फुटले ते खेकड्यांनी फोडले. म्हणजे, यांच्याकडची सर्व माणसे चुकाच करत नाही, यांची माणसे देवासारखीच आहेत का? परमेश्वरानंतर हेच शासन, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित करत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.