ठाणे : भाजप आणि शिंदे गटात जाहिरातीवरुन वाद सुरू झाला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे अशा घोषणेची जाहिरात देण्यात आली होती. त्यावर दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलही करण्यात आले. शिंदे गट आणि भाजपमधील या वादावरुन विरोध त्यांच्यावर टीका करत आहेत. जाहिरातीचा धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.
आव्हाडांची टीका :आम्हाला तुमची दोस्ती तुटावी असे वाटत नाही पण तुमच्या मैत्रीत मिठाचा खडा टाकणारा नारदमुनी कोण ते शोधा असा सल्ला देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि भाजपला टोला लगावला. जो बुंद से गयी वो हौद से नही आती, अशी टोलेबाजी देखील आव्हाडांनी सल्ला देताना केली. शिवसेनेच्या जाहिरात बॉम्बने सेना भाजपच्या मैत्रीत चांगलाच धमाका केला असून दोन्ही पक्षांकडून सध्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण पानभर दिलेल्या शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच कल्लोळ माजला. दुसऱ्या दिवशी सर्वसमावेशक अशी जाहिरात देऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील झाला. परंतु विरोधक मात्र सरकारला घेरण्याचा सोनेरी संधी सोडू इच्छित नाही. हे जितेंद्र आव्हाड यांच्या विधानांमधून स्पष्ट होत आहे.