ठाणे- बंटी बबलीच्या जोडीने डोंबिवलीतील दोन सोनारांना २ लाख २५ हजार रुपयाने गंडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भामट्या बंटी-बबली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील दिनदयाळ रोड परिसरात भूपेश जैन (वय ३७) राहतात. त्यांचे डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात रुचिता ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जैन आपल्या दुकानामध्ये बसले होते. त्यादरम्यान एक अज्ञात पुरुष व महिला त्यांच्या दुकानात आले. त्यांच्यातील पुरुषाने आपले नाव प्रेम धिल्लोन असे सांगत त्याचा भिवंडी येथे कपड्याचा कारखाना असल्याचे जैन यांना सांगितले. सोबत असलेल्या त्याच्या पत्नीने आपले नाव प्रमिला असल्याचे सांगितले.
बंटी-बबली ने सोनाऱ्याला गंडा घातला त्यानंतर या बंटी-बबलीच्या जोडीने सोन्याचे दागिने विकत घ्यायचे असल्याचे जैन यांना सांगितले. त्यानुसार जैन यांनी दुकानातील विविध सोन्याचे दागिने दाखवायला सुरुवात केली. दोघांनी जैन यांच्या दुकानातून मंगळसूत्र, दोन अंगठ्या, कानातील रिंग एक नथ आणि एक पेंडल असे सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने खरेदी केले.
दागिने खरेदी करून झाल्यावर या दोघेही बंटी-बबलीने आमच्याकडे रोख रक्कम नसल्याचे जैन यांना सांगितले. त्यांनी जैन यांच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस द्वारे रक्कम जमा करतो असे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार जैन यांनी या भामट्यांना सर्व माहिती दिली. थोड्या कालावधीनंतर हे भामटे पुन्हा दुकानात आले आणि त्यांनी सदरची रक्कम आरटीजीएस द्वारे पाठवल्याचे जैन यांना सांगितले.
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जैन यांनी या भामट्यांना दागिने दिले. त्यानंतर या जोडगोळीने तिथून काढता पाय घेतला. मात्र पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याची जैन यांना खात्री पटली. त्यानंतर जैन यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मे महिन्यातही एका सोनाराला अशाच पद्धतीने लुबाडण्याची घटना घडली होती. भिमसिंग कडे यांचीही अशाच स्वरूपाने फसवणूक झाली होती. त्यांच्या कावेरी ज्वेलर्स या दागिन्याच्या दुकानातून याच बंटी-बबली ने ८ मे रोजी सुमारे ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.