ठाणे -राज्यात सत्ता असूनसुध्दा पक्ष कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. त्यामुळे आता जिल्हास्तरावर पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करण्यात येतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच आगामी निवडणुका या स्वबळावर लढविण्याच्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू आहे. त्यासाठी राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे. भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय व स्व.राजीव गांधी चौक नूतनीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
'त्या' नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई
भिवंडीमध्ये अठरा नगरसेवकांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ही गंभीर बाब असून लवकरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, व त्यांचे नगरसेवक पद रद्द केले जाईल असेही यावेळी नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावेळी नगरसेवक रिषिका राका यांच्या पक्ष कार्यालयात महापालिका नगरसेवक,पदाधिकारी यांची विशेष बैठक नाना पटोले यांनी घेतली. या बैठकीला माजी मंत्री अरिफ नसीम खान, शहराध्यक्ष ऍड.रशिद ताहीर मोमीन, माजी महापौर जावेद दळवी, प्रदेश सचिव प्रदीप राका, प्रदेश सरचिटणीस तारीक फारुकी नगरसेवक रिषिका राका, काँग्रेस युवा नेते दयानंद चोरघे, मुख्तार खान यांची उपस्थिती होती.