ठाणे- विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्याने राजकीय नेत्यांना पक्षांतराचे वेध लागले आहेत. यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वाधिक इनकमिंग सुरु आहे. तरीही, पक्षांतराबाबत शिवसेनेने नरोवा कुंजरोवा भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सध्या पक्षांतरावर कोणीच बोलू नये, कोण कुठे जाईल आणि कोण मधल्यामध्ये लटकेल ? काही सांगू शकत नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस महाराष्ट्रात पक्षांतराचा पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संजय राऊत शनिवारी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ठाण्यात आले होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी,खासदार राऊत यांच्यासह पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, खासदार कुमार केतकर, विवेक पंडित, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर, शिवसेना उपनेते अनंत तरे, साहित्यिक प्रवीण दवणे मान्यवर उपस्थित होते.