ठाणे -नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी शिवसेना ठाम असताना दुसरीकडे विरोधक आणि स्थानिक भूमिपूत्र दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान, आज नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटीलांचे नाव द्यावे, याकरिता माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिकांनी मोर्चा काढला होता. यावेळी सिडको भवनाला घेराव घालण्यात आला. माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली एका शिष्टमंडळाने सिडको भवनात जाऊन आयुक्तांना यासंदर्भातील निवेदन दिले. तसेच विमानतळाच्या नामांतराचा वाद 15 ऑगस्टपर्यंत निकाली काढावा तसेच या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मोर्चादरम्यान होता पोलिसांचा बंदोबस्त -
दरम्यान, सिडको भवनावर निघणार्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी नवी मुंबईतील 1 हजार प्रकल्पग्रस्तांना यासंदर्भात नवी मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती. मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता नवी मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहनांची वाहतूकदेखील बंद ठेवण्यात आली होती. याबरोबरच वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. तसेच या मोर्चासाठी राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्यांसह तब्बल 5000 पेक्षा अधिक पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. तसेच प्रकल्पग्रस्त इथपर्यंत पोहचू नये म्हणून नवी मुंबई व परिसरातील गावांच्या हद्दी सील करत सर्वत्र बॅरीगेट्स लावण्यात आले होते. यादरम्यान, नवी मुंबईतील नागरिकांना घरातून बाहेर पडू नये. अगदी महत्वाचे काम असल्यास, बाहेर पडावे, असे आवाहनही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी केले होते.
हेही वाचा -राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका; घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आंदोलनामुळे वाहतुकीस अडचण -
नवी मुंबईतील विमानतळाला भूमिपुत्रांचे दिगवंत नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे म्हणून गुरुवारी सिडको भवनाला घेराव आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्या अगोदरच मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्राफिक जाम पाहण्यास मिळायला. वाहतूक संथगतीने पुढे सरकत होती. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.