ठाणे : जादा परतावा मिळण्याच्या आमिषाने अनेकदा गुंतवणूकदारांची फसवणूक होत असते. त्यामुळे अशा गुंतवणुकीच्या योजनांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने ठाण्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर बंटी बबलीच्या जोडीसह चार भामट्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिक महेंद्र भानुशाली (वय, 45, रा. टिळकनगर, डोंबिवली) असे तक्रारदार गुंतवणूकदाराचे नाव आहे. तर युनिक कन्सलटन्सीचे मालक आणि भागीदार विनय पुरुषोत्तम वर्टी (वय, 68), गीता विनय वर्टी (वय, 60, रा. निळकंठ सोसायटी,, डोंबिवली पूर्व), असे बंटी बबलीच्या जोडीचे नाव आहे. तर डाॅ. सी. के. नारायण (वय 60, रा. गोवंडी, मुंबई ), श्रीधर ( वय, 50, मुंबई) अशी चार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या भामट्यांची नावे आहेत.
गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा आणि दुप्पट पैसे-पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रतिक भानुशाली यांना आरोपी विनय आणि गीता वर्टी या बंटी बाबलीसह मुबंईत राहणाऱ्या डॉक्टर असलेल्या भागीदारांनी युनिक कन्सलटन्सीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या गुंतवणूक योजनेत डिसेंबर 2021 मध्ये 60 लाख 50 हजार गुंतविण्यास तक्रारदाराला सांगितले होते. शिवाय या गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा आणि वर्षभरात हे पैसे दुप्पट करुन देतो, असे आमिष दाखविले. पैशांबरोबर सोनेही देण्याची हमी आरोपी भामट्यांनी दिली होती. त्यानंतर वाढीव व्याज आणि सोने असे एकूण 4 कोटी रुपये भामट्यावर विश्वास संपादन करून तक्रारदार प्रतिक यांना गुंतविण्यास भाग पाडले होते.