ठाणे - उल्हासनगरातील कोरोना रुग्णांसाठी एक्सपायरी डेट संपलेली बिस्कीट आणि किडे पडलेल्या खिचडीचा टेम्पो महापालिका मुख्यालय प्रांगणात भाजपा, मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडला. या प्रकाराने खळबळ उडाली आहेत. महापालिकेने याबाबत कानावर हात ठेवले. तर मनसे, भाजपाने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करून चौकशीची मागणी केली.
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यासाठी जाणारा टेम्पो भाजपा आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडला. टेम्पोमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण आणि एक्सपायरी डेट उलटलेली बिस्किटे आढळल्याने महापालिका अधिकारी यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांना निश्चित माहिती देता आली नाही. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी टेम्पो चालकाकडे महापालिकाविषयी कोणतेही कागदपत्रे आढळले नसल्याने, ते साहित्य महापालिकेचे नाही, असे माध्यमांना सांगितले.
यानंतर मात्र, मग टेम्पो पालिकेत आलाच कसा? असा पवित्रा भाजप आणि मनसे पदाधिकारी यांनी घेऊन टेम्पोला महापालिका प्रांगणात उभे करून ठेवले. महापालिका स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी आक्रमक भूमिका घेऊन कोरोना बाधितांच्या जीवनाशी खेळ चालू असल्याचा आरोप केला.