ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. कळव्यातील मनीषा नगर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना पौळ म्हणाल्या हा कार्यक्रम ठाकरे गटाचा कार्यक्रम नव्हता. मारहाण करण्यासाठी ट्रॅप रचण्यात आला असल्याचा आरोप यावेळी पौळ यांनी केला. मिंधे गट कुठून कोणती शक्कल लावतील याचा काही नेम नाही, असा आरोप यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आला.
कुठे होता कार्यक्रम : कळव्यातील मनीषा नगर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तसेच सुषमा अंधारे आणि खासदार राजन विचारे, ठाकरे गट ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे देखील या कार्यक्रमास येणार असल्याचे भासवण्यात आले. त्यानुसार पोळ यांना कार्यक्रमाचे आमंत्रित करण्यात आले असे महिला पदाधिकारी यांनी सांगितले. दरम्यान यावेळी सर्व महापुरुष यांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पौळ यांच्यावर प्रथम शाई फेकली. त्यानंतर मारहाण करत अंगावर मोठ्या संख्येने धावून आल्या. यावेळी ठाकरे गटाच्या कोणताही पदाधिकारी या ठिकाणी नाहीत हे लक्षात आले.