पनवेल : तळोजामध्ये कमान कोसळून जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू - तळोजा एमआयडीसी
तळोजा एमआयडीसीत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या चार-पाच महिन्यांपासून कमानीचे बांधकाम सुरू आहे. तळोजा एमआयडीसीचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात येणाऱ्या या कमानीचा काही भाग काल रात्री कोसळला. यात ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झालेल्या दोन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
![पनवेल : तळोजामध्ये कमान कोसळून जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4677742-994-4677742-1570435074220.jpg)
कामगाराचा मृत्यू
पनवेल- तळोजामधील बांधकाम सुरू असलेली कमान कोसळली होती. यात ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झालेल्या दोन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 26 वर्षीय राजेश शर्मा असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात नावडे फाटा येथे काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया
गेल्या चार पाच महिन्यांपासून त्या ठिकाणी कमानीचे बांधकाम सुरू असून काल कमानीचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. दरम्यान, एमआयडीसीकडून आदित्य इंटरप्रायजेस या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले असून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरू आहे. या घटनेत दोन कामगार बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. यात ते दोघेही जखमी झाले असल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. परंतु, यातील एक कामगार राजेश शर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरा कामगार सुरक्षित आहे. कंत्राटदार आदित्य एंटरप्राइजेसच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा बळी गेल्याने त्याच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. तळोजा पोलिसांनी यावर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.