ठाणे- भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेला वेळेत रुग्णवाहिका मिळाली नसल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवर घडली आहे. विशेष म्हणजे रुग्णवाहिका येत नसल्याचे पाहून स्थानिकांनी जखमी महिलेचे प्राण वाचविण्यासाठी पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, स्थानिकांना महिलेचा जीव वाचवण्यात यश आले नाही. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वरावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने अपघातातील जखमी वृद्ध महिलेचा मृत्यू - रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णालयात नेण्यास उशीर
कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवर एका वयोवृद्ध महिलेला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने स्थानिकांनी महिलेला पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात नेले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आज (सोमवार) सायंकाळी ५ च्या सुमाराला पुनालिंक रोडवरील नंदादीप नगर मधून चक्की नाका ते श्रीराम टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावरून एक दुचाकीस्वार भरधाव वेगात जात होता. त्यावेळी त्या भरधाव दुचाकीची धडक वृद्ध महिलेला बसली त्यात ती गंभीर जखमी झाली. अपघात झाल्याची माहिती जवळच असलेल्या स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांना मिळताच त्यांनी महिलेला तातडीने उपचार मिळावा. म्हणून रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, १ तास उलटून गेला तरी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे पाहून, त्या रस्त्याने जाणाऱ्या एका पोलीस व्हॅनला थांबवण्यात आले. पोलीस व्हॅनमधून गंभीर अवस्थेत असलेल्या त्या महिलेला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी करुन मृत घोषित केले.
दरम्यान, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर या महिलेचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया नगरसेवक गायकवाड यांनी दिली. मात्र, ही महिला कोण आहे याची ओळख पटली नसून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.