ठाणे -मुंब्र्यातील एका महिलेने 'मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायदा' अंतर्गत आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिच्या पतीने व्हॉट्सअॅपवर 3 वेळा तलाक असे लिहून तिला गेल्या वर्षीच घटस्फोट दिला होता. त्यामुळे या महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नव्याने बनवण्यात आलेल्या तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पोलिसांनी तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
या महिलेचे एमबीए झालेले असून, तिला 6 महिन्यांचा मुलगा आहे. पतीचे नाव इम्तियाज गुलाम पटेल असून तो 35 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी त्याने आपल्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर तलाक दिला होता. तलाक दिल्यानंतर गेल्या वर्षीपासून तो दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून राहत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पतीसोबतच सासू आणि नणंद यांच्याबद्दलही या महिलेने छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 'मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायदा' अंतर्गत या पुरूषावर गुन्हे दाखल केले आहेत. या कायद्यात अंतर्गत विनाजामीनपात्र गुन्हा व 3 वर्ष कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.