ठाणे - उल्हासनगर महापालिकेतील बोकाळलेला भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकामे, शिक्षण विभाग कार्यालयाचे स्थलांतर आदी मुद्द्यांवर बुधवारी अन्याय विरोधी संघर्ष समितीने पालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलनकांनी पालिका आयुक्तांचा निषेध व्यक्त केला.
बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात पालिका मुख्यालयासमोर सामाजिक संघटनेचे आंदोलन - social
उल्हासनगर महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. त्याविरोधात येथील अन्याय विरोधी संघर्ष समितीने पालिकेच्या मुख्याल्यासमोर आंदोलन करत आयुक्तांचा निषेध नोंदविला.
उल्हासनगर महापालिकेत आयुक्त अच्युत हांगे यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनाच्या कामात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या ४ महिन्यांच्या कार्यकाळात शहरात मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. तसेच तातडीच्या आपत्कालीन निधीचा गैरवापर, करवसुलीत दिरंगाई, शिक्षण विभागाचे मुख्यालयातून बेकायदेशीर स्थलांतर व अन्य विभागत होत असलेल्या घोटाळ्याचा आरोप करत उल्हासनगरमधील अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
दरम्यान, महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आज सकाळी १० ते १ वाजेपर्यंत पालिका मुख्यालयासमोर संघटनेच्यावतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. या संदर्भात एक लेखी निवेदन आयुक्तांना समितीकडून देण्यात आले आहे. या आंदोलनात शहरातील अनेक सामाजिक संघटना, विविध पक्षाचे राजकीय नेते, तसेच सर्वसामान्य नागरिक या आंदोलनाला पाठिंबा देत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.