महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा फटका..! ऑनलाइन पद्धतीने मीरा भाईंदरच्या तिजोरीत केवळ दीड कोटीच कर जमा - मीरा भाईदर महापालिका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे वेळेवर बिल वाटप केले नाही, तसेच वसुली करण्यासाठी कर्मचारी घरोघरी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिका तर्फे ऑनलाइन कर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, गेल्या पाच महिन्यात अपेक्षेप्रमाणे कर जमा झाला नाही.

 Income decreased of MBMC due to ongoing corona pandemic
Income decreased of MBMC due to ongoing corona pandemic

By

Published : Aug 12, 2020, 12:38 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे) - कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका मीरा भाईंदर महानगरपालिकेला अधिक सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेला चालू वर्षात मालमत्ता कर उत्पनातून २७१ कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र, गेल्या पाच महिन्यात ऑनलाइन पद्धतीने केवळ दीड कोटीच रुपये जमा झाले असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे वेळेवर बिल वाटप केले नाही. तसेच वसुली करण्यासाठी कर्मचारी घरोघरी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिका तर्फे ऑनलाइन कर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, गेल्या पाच महिन्यात अपेक्षेप्रमाणे कर जमा झाला नाही.

मीरा-भाईंदर शहरात साधरणत: ३.५ लाख मालमत्ता कर धारक आहेत. यापैकी अडीच लाखाहून अधिक निवासी कर धारक आहेत. गेल्यावर्षी मालमत्ता करापोटी २१६ कोटी रुपयांचे उत्पत्त प्रशासनाने अपेक्षिले होते. यापैकी फक्त १३५ कोटी रुपये या करापोटी महापालिकेला मिळाले होते. चालु आर्थिक वर्षात महापालिकेने २७१ कोटी रुपयांचे उत्पन्न या मालमत्ता करापोटी मिळणार असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली महापालिकेने मालमत्ता कर विभागातील कर्मचारी वर्गाला देखील रस्त्यावर उतरविले आहे. त्यामुळे मालमत्ता कराची देयची कर दात्यांना वितरीत होऊ शकली नाही.

या विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याने मालमत्ता कराची देयके अक्षरश: धुळ खात पडून आहेत. मागील पाच महिन्यांपासून हा विभाग बंद असून आत्तापर्यंत ऑनलाईन पद्धतीने केवळ दीड कोटीचाच महसूल गोळा झाला आहे. मालमत्ता कराची वसूली झाली नसल्याने त्याचा विपरित परीणाम शहरातील विकास कामांवर होणार आहे. इतकेच नव्हे तर कर्मचार्‍यांच्या वेतनावर देखील आर्थिक संकटाचे सावट पडले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवसाय बंद होते. तर अनेक खासगी कंपनीच्या नोकर वर्गाचा पगार कपात केली आहे. त्यामुळे मालमत्ता करात सूट द्यावी. अथवा मालमत्ता कर रद्द करावा, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. मात्र लोकांच्या भावना लक्षात घेता मालमत्ता करात सुट देण्याचा प्रस्ताव भाजपाकडून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाण्याची दाट शक्यता असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.

आर्थिक उत्पन्न घटल्याची परिस्थिती केवळ मीरा भाईंदर मध्येच नाही तर प्रत्येक महानगरपालिकेची आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मनपाचे सर्व विभागाचे कर्मचारी तसेच कर विभागाचे कर्मचारी या कामात व्यस्त आहेत. त्यामुळेच बिलाचे वाटप वेळेवर झाले नाही, आता शहरात कोरोनावर अंकुश ठेवण्यात थोडे यश आले आहे. रुग्णाच्या उपचारासाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. घरोघरी बिलांचे वाटप व वसुली सुरू करण्यात येणार आहे तसेच ऑनलाइन बिल भरण्यासाठी करदात्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती मीरा भाईंदर महानगरपालिका कर निर्धारक व संकलन अधिकारी संजय दोंदे यांनी ईटीव्ही भारतला दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details