ठाणे : कल्याण पश्चिम भागातील पारनाका परिसरात असलेल्या मेघश्याम प्रसाद या हाय प्रोफाईल सोसायटीतील रहिवासी दर्शन निशिकांत परांजपे (वय ४०) असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे. तर तक्रारदार अविनाश श्रीधर कुलकर्णी हे सेवानिवृत्त असून ते पुणे येथील कात्रज बिबवेवाडी परिसरात कुटुंबासह राहतात. २०२२ साली तक्रारदार कुलकर्णी यांची ओळख आरोपी परांजपे याच्याशी झाली. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत त्याने डिसेंबर २०२२ मध्ये कुलकर्णी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला ८० टक्के व्याज मिळवून देतो, असे आमिष दाखवले.
परांजपे याच्या अमिषाला बळी पडून कुलकर्णींसह कल्याण मधील काही गुंतवणूकदारांनी दोन वर्षापूर्वी आरोपी परांजपेवर विश्वास ठेवला. आणि ८० टक्के व्याज मिळेल या आशेने आपल्या बँक खात्यांमधून ऑनलाईन व विविध माध्यमातून आरोपी परांजपे याच्या बँक खात्यावर पैसे जमा केले. विशेष म्हणजे डिसेंबर २०२२ ते आतापर्यंत या सर्व गुंतवणूकदारांनी एकूण ९ कोटी ९ लाख ६४ हजार ५०० रुपये आरोपी परांजपे याला ऑनलाईन ट्रान्सफर केले.