ठाणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसुलीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या ९६ हजार ८२ प्रकरणांमधील दंड भरण्यात आला आहे.
माहिती देताना वाहतूक शाखा उपायुक्त बाळासाहेब पाटील हेही वाचा -मीरा-भाईंदरमध्ये अश्लील अंगविक्षेप चालवणाऱ्या २ बारवर कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी १४ फेब्रुवारीपासून ई चलान बजावण्यास सुरूवात केली होती. १३ डिसेंबर, २०२० पर्यंत सुमारे १० लाख ५० हजार वाहनचालकांना नियमभंग केल्याप्रकरणी ई चलान बजावण्यात आले होते. त्यांची दंडाची रक्कम सुमारे २६ कोटी रुपये आहे. ई चलान असल्याने दंडाची ही रक्कम भरण्यास वाहनचालक टाळाटाळ करत होते. कारवाई होत नसल्याने त्यांची बेदरकारीसुद्धा वाढली होती. वाहनचालकांमध्ये नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढावी यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ई चलानच्या दंड वसुलीसाठी १ डिसेंबर, २०२० पासून धडक मोहीम सुरू केली.
मोहिमेंतर्गत इतका दंड वसूल झाला
या मोहिमेंतर्गत महिन्याभरात ३ कोटी २३ लाख ९४ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. वसुलीत कार्डच्या माध्यमातून ३९ हजार १६८ प्रकरणांमध्ये १ कोटी ५२ लाख रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. तर, ५६ हजार ९१६ वाहनचालकांनी रोखीने १ कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या मोहिमेंतर्गत होणारी कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, वाहन चालकांनी आपापल्या दंडाची थकीत रक्कम भरावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले.
नारपोली विभागाने सर्वाधिक दंड वसूल केला
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित ठाणे वाहतूक पोलिसांचे १८ विभाग कार्यरत आहेत. यापैकी नारपोली विभागाने सर्वाधिक ४० लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्या खालोखाल कल्याण २९ लाख १५ हजार, उल्हासनगर २७ लाख ५९ हजार, कळवा २६ लाख ५५ हजार या विभागाचा क्रमांक लागतो. आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भरण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले.
अशा पद्धतीने भरा ई चलानचा दंड
१. ठाणे शहर वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली ५९ अधिकारी आणि अंमलदारांकडे ई चलान मशीन आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही चलानची रक्कम रोख किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तिथे भरता येते. २. www.mahatraffic.gov.in या शासनाच्या वेबसाईटवर आपल्या वाहनाचा किंवा चलान क्रमांक नोंदविल्यास प्रलंबित तडजोड शुल्क दिसून येईल. तिथे चलान क्रमांकाची निवड करून दंडाची रक्कम भरता येते.
३. पेटीएम अॅपमध्ये रिचार्ज आणि बिल पेमेंट या पर्यायांवर क्लिक केल्यानंतर चलान नावाचा टॅब दिसतो. तिथे पुन्हा क्लिक केल्यानंतर Traffic Authority अशी विचारणा केली जाते. त्यावर महाराष्ट्र ट्राफिक पोलीस हा पर्याय निवडावा. त्यानंतर वाहन किंवा चलान क्रमांक नोंदवून दंडाची रक्कम भरता येते.
४. Mahatriffic App, Mum traffic App मध्ये My Vehicle या टॅबवर क्लिक करून आपल्या गाडीचे रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर My E challan मध्ये आपल्या गाडीवर किती तडजोड रक्कम भरायची आहे ते दिसेल. त्यानंतर चलानवर क्लिक करून त्या रकमेचा भरणा करता येईल.
हेही वाचा -अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून