ठाणे -ठाणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ आहे, याचा प्रत्यय वसंत विहार येथील एका ज्येष्ठ दाम्पत्याला आला आहे. 13 एप्रिलपासून रुग्णालयात दाखल करण्यासाठी विनंती करुनही वॉररूममधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर या दाम्पत्याने घरातच स्वत:हून ऑक्सिजन लावून घेतले आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या कर्मचार्यांनी संबंधित दाम्पत्याच्या घरी येऊन चौकशी केल्यानंतरही वॉररूममध्ये नोंदणी झाली नसल्याने बेड मिळणार नाही, असे या दाम्पत्याला सांगितले आहे.
ठाणे न्यायालयात कार्यरत असलेली एक महिला आणि तिचा पती यांचा कोविड रिपोर्ट 13 एप्रिल रोजी आला होता. त्यानंतर त्यांनी ठामपाच्या वॉर रुमशी संपर्क साधून रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. पालिकेच्या कर्मचार्यांनीही या दाम्पत्याची विचारपूस केली. मात्र, दोन दिवस उलटल्यानंतरही त्यांची कुठेही व्यवस्था झाली नाही. त्यानंतर सदर दाम्पत्याने वॉररुमशी संपर्क साधला असता 'तुमची नोंदणीच झालेली नाही, त्यामुळे तुम्हाला बेड कसा मिळणार?' असा प्रतिप्रश्न करून रुग्णालयातील प्रवेश नाकारला. त्यामुळे गुरुवारी सदर महिलेची प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या तिच्या पतीनेच बाहेर जाऊन ऑक्सिजनची व्यवस्था केली आणि घरातच या महिलेला ऑक्सिजन लावावा लागला.