ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य शासनामार्फत 1 मेपासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील दिवाअंजुर आणि शहापूर तालुक्यातील शेंद्रुण या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लसीकरण करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे 139 आणि 71 असे एकूण 210 नागरिकांनी लस घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे यांनी दिली. तसेच 'मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाइन बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे फक्त लसीकरण होणार आहे. इतर नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी करू नये', असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे यांनी केले आहे.
लसीकरणासाठी ऑनलाइन बुकिंग करा
सध्या राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण फक्त ऑनलाइन बुकिंगद्वारे होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी www.cowin.gov.in या वेबसाइटवर नोदणी करावी. वेबसाइटवर सांगितल्याप्रमाणे माहिती भरुन उपलब्ध लसीकरण सत्रांमध्ये ऑनलाइन appointment घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.