ठाणे - दिवसभर घराघरांमध्ये पेंटरचे काम करणारा कारागीर दुचाकी लंपास करणारा चोरटा निघाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, दिवसा दुचाकींची रेकी करून ठेवायची आणि त्यानंतर दुचाकी लंपास करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या चोरट्याला अटक केली. अब्दुल्लाह, असे चोरट्याचे नाव आहे.
दुचाकी चोर आणि जप्त केलेल्या दुचाकींचे दृष्य हेही वाचा -भिवंडीत भाजी मंडई लगतच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून चोरट्याला पकडले..
भिवंडी शहरात दिवसागणिक चार ते पाच दुचाकी चोरीच्या घटना घडत असून अशीच एक दुचाकी चोरीची घटना देवजी नगर परिसरातील इमारतीमध्ये राहणारे अहमद शेख यांच्यासोबत घडली. शेख यांनी राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांची दुचाकी उभी केली होती. 27 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची दुचाकी चोरीला गेली. त्यांनी या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, कमी किमतीत एक पेंटर दुचाकी विकत असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.ए. इंदलकर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.बी. वाघ, पोलीस नाईक गोरले, पोलीस शिपाई सूर्यवंशी, कुंभार, कवडे, गायकवाड या पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून कमी किमतीत चोरीची दुचाकी विकणाऱ्या अब्दुल्लाह याला ताब्यात घेतले.
दुचाकी लंपास करून मोकळ्या मैदानात ठेवायचा..
अब्दुल्लाहकडून आतापर्यंत पोलिसांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लंपास केलेल्या 2 लाख 35 हजार किंमतीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अब्दुल्लाह लंपास केलेल्या दुचाकी मोकळ्या मैदानातील पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवत असे.
हेही वाचा -नवी मुंबई महापालिका क्षेत्रात समान काम समान वेतन लागू करण्याची मागणी