ठाणे - जय श्रीराम न बोलल्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात घडली. यानंतर कोळशेवाडी पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला प्रतिबंधक कारवाई करत ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी आरोपीवर अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. तर यामध्ये जय श्रीरामाचा उल्लेख न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याणमध्ये 'जय श्रीराम' बोलण्यास टाळणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण - तुला जय श्रीराम बोलावे लागेल
कल्याणमध्ये जय श्रीराम न बोलल्याने तरुणास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. तसेच या तरुणावर लगेचच अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहणारा हा तरुण आपल्या गॅरेजमध्ये गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काम करत होता. त्यावेळी त्याठिकाणी कार्तिक नावाचा तरुण आला. कार्तिकने या तरुणाला जय श्रीराम बोलायला सांगितले. मात्र, हा तरुण कामात व्यस्त असल्याने त्याने कार्तिकला मी कामात आहे मला त्रास देऊ नको, असे बजावले. त्यामुळे संतापलेल्या कार्तिकने तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तुला जय श्रीराम बोलावे लागेल, असा हट्ट धरला. तसेच तू पाकिस्तानी आहेस, अतिरेकी आहेस, असे बोलून कार्तिक त्याच्या अंगावर चाकू घेऊन धावून गेला. मात्र, त्याचवेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन कार्तिकला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
याप्रकरणी, कोळशेवाडी पोलिसांनी या तरुणाची तक्रार दाखल करुन घेतली आहे. तर कार्तिकला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करत प्रतिबंधक कारवाई केली आहे. मात्र, पोलिसांनी या तक्रारीमध्ये 'जय श्रीराम'चा उल्लेख टाळला आहे. याबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी तपास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकाराने कल्याण पूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे.