ठाणे-भिवंडी तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली. या गुन्ह्याच्या अंतिम सुनावणीवेळी जिल्हा सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना दोषी ठरवित तीन वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे व गणेश बाबु मुळे असे शिक्षा झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - यवतमाळमध्ये क्रेडिट कार्डद्वारे २ लाखांचा गंडा; मुख्य सूत्रधार मध्य प्रदेशमधील
6 डिसेंबर 2013 रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतलेल्या अल्पवयीन मुलीला आईने दूध आणण्यासाठी नाक्यावर पाठविले असता, दूध घेऊन घरी येत असताना तिचा दोघांनी विनयभंग केला. त्यांनतर घडलेल्या घटनेबाबत घरच्यांना काही सांगितल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या आशा भोईर यांनी पीडितेच्या कुटुंबाला मदत केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे व गणेश बाबु मुळे याच्या विरोधात भादंवि कलम 354 अ, 504, 506, 34 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा कलम 7, 8 यानुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी करीत होते. "पोलिसांनी दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे तपास केल्यानेच या गुन्ह्यात पीडित आदिवासी मुलीस न्याय देण्यात यश आले आहे." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या आशा भोईर यांनी दिली.
हेही वाचा - अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बदनामीच्या भीतीने मुलीने घेतले उंदीर मारायचे औषध